८ हॉटेल्ससह कॅन्टीन्सचे परवाने निलंबित

Foto
एफडीएचा दणका : शाकाहारी-मांसाहारी पदार्थांची एकत्र साठवणूक
White Palace
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो): राज्यभरात राबविल्या जात असलेल्या 'सेफ फूड सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने शहरात धडाकेबाज कारवाई केली आहे. अन्न सुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या शहरातील ८ प्रमुख बड्या हॉटेल्स आणि इंडस्ट्रियल कॅन्टीन्सचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. एफडीएच्या अचानक
झालेल्या कारवाईमुळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या अन्न व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने शहरात व परिसरात मोठी धडक कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा, २००६ च्या कलम ३२ (३) मधील तरतुदींनुसार, एकूण आठ प्रमुख अन्न व्यवसायांचे (बेकरी, हॉटेल्स आणि इंडस्ट्रियल कॅन्टीन्स)
परवाने, नोंदणी प्रमाणपत्रे तात्काळ निलंबित करण्यात आली आहेत. सक्षम परवाना व नोंदणी प्राधिकारी तथा सहाय्यक आयुक्त द. वि. पाटील यांच्या आदेशाने ही धडक मोहीम राबविण्यात आली.
तपासणीदरम्यान या आस्थापनांमध्ये अस्वच्छ वातावरण, कीड प्रादुर्भाव, अन्न तपासणीचा अभाव आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची हेळसांड अशा गंभीर त्रुटी
आढळून आल्या. रेस्टॉरंटमध्ये कीड नियंत्रणाचा अभाव असून केवळ बिलाव्यतिरिक्त कोणताही ठोस पुरावा आढळला नाही. शाकाहारी व मांसाहारी अन्न स्वतंत्र न ठेवता एकत्र साठवल्याचे समोर आले आहे. वैध परवाना दर्शनी भागात लावलेला नव्हता. कर्मचाऱ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी, लॅब रिपोर्ट्स, आणि सुरक्षित अन्न हाताळणीचे अनिवार्य प्रशिक्षण प्रमाणपत्रे पूर्णपणे गैरहजर होती.
प्रशासनाचा कडक इशारा व पुढील आदेश
सदर निलंबन आदेशानंतर संबंधित सर्व आस्थापनांना त्यांचे अन्न उत्पादन, साठवणूक, विक्री व वितरण तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केवळ त्रुटी दुरुस्तीचे पत्र सादर केल्याने हे निलंबन उठवले जाणार नाही; संबंधित अन्न सुरक्षा अधिकारी पेढ्यांवर पाळत ठेवतील आणि प्रत्यक्ष फेरतपासणीमध्ये पूर्ण समाधान झाल्यानंतरच स्वतंत्र आदेशाद्वारे निलंबन मागे घेतले जाईल. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही अन्न व्यवसायिकाची गय केली जाणार नाही आणि यापुढेही अशी धडक तपासणी मोहीम सुरूच राहील, असा इशारा सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions